माती च शेतीतल महत्व – भाग -01 Importance of soil in agriculture Marathi – संकलन:- अनंत जुगेले,कृषी अधिकारी

माती च पीक लागवडी करता महत्व – Importance of soil in agriculture Marathi

पृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब लोकसंख्येला ९५ टक्के अन्न उत्पादन करून देणारे माध्यम म्हणजे माती! माती पिकाच्या मुळाला आधार, अन्न आणि पाणी देते.

मातीत अहोरात्र कोट्यवधी जीव शेकडो रासायनिक अभिक्रियांद्वारे मातीच्या जडण घडणाचे काम करतात. म्हणून माती हे सजीव माध्यम आहे. कोट्यवधी सूक्ष्म जिवाणूंनी समृद्ध, पोषक अन्नद्रव्ये, हवा आणि पाणी असा सुवर्ण संगम साधलेले माध्यम माती हेच मानवी संस्कृतीच्या विकासाचे उगम स्थान आहे. म्हणून मातीला आपण काळी आई म्हणतो. शेतीसाठी तर मातीचे महत्त्व फारच आहे.

आता प्रश्न पडतो की असे काय घडले की मातीसाठी असा दिवस साजरा करण्याची वेळ यावी. तर मग ही आकडेवारी पहा.

भारताच्या ३२८.७३ दशलक्ष हेक्टर जमिनीच्या क्षेत्रफळापैकी १२०.४० दशलक्ष हेक्टर एवढी जमीन नापीक होत चालली आहे.

  • पाणी आणि हवेमुळे देशातील दरवर्षी ५.३ अरब टन सुपीक मातीची धूप होऊन ती नष्ट होत आहे!
  • महाराष्ट्राच्या ३.०७ दशलक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळापैकी सुमारे ४२.५० टक्के जमीन खराब आहे.
  • राज्यातील १५९ लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळाच्या छायेत येते. पिकांची उत्पादकता कमी असून राज्यात सुमारे १४६ लाख हेक्टर क्षेत्रफळावर माती आणि पाणी संवर्धनाची तात्काळ गरज आहे.
  • मातीची निर्मिती प्रक्रिया अतिशय किचकट असून खडकांपासून बारीक मातीचे कण निर्मितीसाठी शेकडो वर्ष लागतात. ऊन, वारा, पाऊस या निसर्गचक्राद्वारे हळूहळू अनेक प्रकारचे खडक खंडित होत होत मातीत रूपांतरित होतात.
  • मातीचे प्रारूप चार घटकात विभाजित केले जाते. ज्या मातीत ४५ टक्के मातीचे कण, २५ टक्के पाणी, २५ टक्के हवा आणि ५ टक्के सेंद्रिय कर्ब असते ती पिकाच्या वाढीसाठी आदर्श माती! हे प्रमाण जर बिघडले तर मातीचे आरोग्य बिघडले असे समजावे.
  • मातीची सुपीकता आणि उत्पादकता हे मातीचे गुणवत्ता मोजण्याची दोन परिमाणे आहेत. मातीची सुपीकता म्हणजे पिकाला लागणारे सर्व अन्नघटक पुरवण्याची मातीची अंगभूत क्षमता.
  • ही क्षमता मातीच्या निर्मिती प्रक्रियेपासून तयार झालेली असते. ती सहजासहजी बदलता येत नाही.
  • पिकाच्या वाढीसाठी १७ अन्नघटक लागतात. यापैकी एक अन्नघटकाची जरी कमतरता भासली तर पिकाच्या वाढीवर आणि पर्यायाने ऊस पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. सुपीक मातीत सर्व अन्नघटक पुरेशा प्रमाणात, पिकाला उपलब्ध होतील अशा स्वरूपात असतात.
See also  समतोल आहार म्हणजे काय ? What is balanced diet Marathi

मातीची सुपीकता प्रयोगशाळेत मातीच्या नमुन्याची तपासणी करून ठरवली जाते. म्हणून दर तीन वर्षांने मातीची आरोग्य पत्रिका काढली पाहिजे. मातीची उत्पादकता पिकाच्या एकरी उत्पादनाशी संबंधित आहे. 

मातीचे आरोग्य बिघडण्याची प्रमुख कारणे आहेत

  • पाण्याचा जास्त वापर, जमिनीची धूप, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर, एकच एक पीक वारंवार घेणे आदी.
  • केवळ रासायनिक खतांमुळे जमीन खराब होते असे सर्रास बोलले जाते, हे सत्य नाही.
  • रासायनिक खत हे पिकाचे अन्न आहे जे कमी मात्रेत अधिक अन्नद्रव्ये पिकाला हवे तेव्हा उपलब्ध करतात. जमीन खराब होते रासायनिक खतांच्या चुकीच्या पद्धतीने वापर व शिफारसीपेक्षा जास्त वापरामुळे! खऱ्या अर्थाने मातीचे आरोग्य बिघडते ते पाण्याच्या जास्त वापरामुळे.
  • पिकाला पाणी दिल्यानंतर ते पाणी पीक मुळावाटे हवे तेवढे शोषून घेते, बाकीचे जमिनीत साचून राहते. साचलेले पाणी मातीमधील हवा बाहेर काढून त्याची जागा घेते. वेळीच पाण्याचा निचरा नाही झाला तर पिकाची मुळे गुदमरतात.
  • झाडाची वाढ खुंटते. साचलेल्या पाण्यात मातीतील क्षार विरघळतात. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होते मात्र पाण्यातील क्षार जमिनीवर मातीच्या कणात अडकून राहतात. उसासारख्या पिकाला जेव्हा शेतकरी सतत पाणी देतात तेव्हा अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते.
  • क्षार मातीचे कण जोडतात. माती कडक होते. मातीचे रंध्र बंद होतात. पाणी मुरत नाही. ओलावा टिकत नाही. परिणामी पिकाची वाढ होत नाही आणि अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणून जास्त पाणी देणे कधीही घातक असते.
  • मातीचे आरोग्य तपासणी करण्यासाठी शेतातून मातीचा योग्य पद्धतीने नमुना काढून तो प्रयोगशाळेत तपासून घेणे हे अभ्यासू शेतकऱ्याचे पहिले कर्तव्य आहे.
  • प्रयोगशाळेत मातीमधील उपलब्ध नत्र, स्फूरद, पालाशचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, मातीचा सामू, विद्युत वाहकता आदी घटकांचे प्रमाण, त्याला अनुकूल पीक व त्या पिकासाठी खताची शिफारस या बाबीची विस्तृत मातीची आरोग्य पत्रिका तयार करून शेतकऱ्याला दिली जाते.
  • मातीचा सामू (आम्ल-विम्ल निर्देशांक) ६.५ ते ७.५ असल्यास पिकाच्या विकासासाठी आदर्श असतो. मातीतील सेंद्रिय कर्ब हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सेंद्रिय कर्ब हे मातीत राहून पिकाच्या वाढीसाठी अहोरात्र झटणाऱ्या जिवाणूंचे खाद्य असते.
  • शिवाय सेंद्रिय कर्ब जर जास्त (१% पेक्षा जास्त) असेल तर जमिनीत पाणी चांगले मुरते, ओलावा टिकून राहतो, माती भुसभुशीत राहते. म्हणून चांगले कुजलेले शेणखत, साखर कारखान्याची मळी, लेंडीखत, गांडूळ खत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर रासायनिक खतांसोबत आवश्य करावा.
  • पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी १७ अन्नद्रव्याची गरज असते. नत्र, स्फूरद आणि पालाश हे मुख्य अन्नघटक आहेत जे बहुतांश शेतकरी १०:२६:२६, १२:३२:१६ आदी ग्रेडच्या स्वरूपात वापरतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे दुय्यम अन्नघटक असून शेतकरी यांच्या वापराकडे दुर्लक्ष करतात.
  • याहीपुढे आणखी ११ अन्नघटक जे एकरी काही ग्रॅममध्ये लागतात. सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा वापर फारच कमी शेतकरी करतात. युरियासारखे प्रचलित, स्वस्त खते अधिक वापरून शेतकरी पिकाचे आणि मातीचेही नुकसान करत आहेत.
  • माती परीक्षण अहवालनुसार खते वापरल्यास मातीचे आरोग्य उत्तम राहिलच आणि उत्पादनसुद्धा वाढणार आहे.
See also  बँक अकाऊंट  किती प्रकारचे असतात ?- How many types of bank account  ?

शेतातील काडी कचरा, गवत न जाळता मुलस्थानी पिकाच्या अवशेषाचे विघटन केल्यास सेंद्रिय कर्ब वाढू शकते. पाणलोट क्षेत्र विकासावर भर देऊन माथा ते पायथा मृद-जलसंधारणाचे उपचार प्रभावीपणे राबवायला हवेत

.शेतातील झाडांची संख्या घटत आहे. बांधावर, पाणलोट क्षेत्रात, गायरान आदी क्षेत्रात वृक्षारोपण असेल तरच मातीची धूप थांबू शकेल. पिकाची फेरपालट करावी. मातीची सुपीकता टिकवण्यसाठी संतुलित खत वापर गरजेचे आहे. माती हे अत्यंत दुर्लभ पण दुर्लक्षित संसाधन आहे ही जागरूकता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे असून मातीचे संगोपन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे.

संकलन:- अनंत जुगेले,
 कृषी अधिकारी
Master of Agriculture Science (Agronomy )